अहमदनगर - राज्यातील दूध उत्पादन शेतकरी गेल्या दीड वर्षांपासून दूध दरवाढीची मागणी करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. दुधाला दहा रुपये तर दूध भूकटीला पन्नास रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आजपासून भाजपने राज्यस्तरीय महाएल्गार दुधदरवाढ आंदोलन सुरू केलं आहे.
नगर जिल्ह्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन दुधाबाबतची व्यथा जाणून घेत आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पोस्टकार्ड टाकून दुधाला आणि दुधभूकटीला अनुदान मिळावे या आशयाचे पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री जागे व्हा . .
दूध उत्पादक शेतकरी आता मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहत असून, मुख्यमंत्री जागे व्हा, दुधाला दरवाढ द्या अशी मागणी करणार आहेत. दूध दरवाढ आणि अनुदानासाठी विविध शेतकरी संघटना, विरोधीपक्ष यासह आता राजू शेट्टी यांच्य्या सरकारला पाठबळ देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पण आंदोलनास सुरुवात केली आहे.
भाजप काळात दुधाचे पाच रुपये अनुदान सध्या बंद आहे. अशात दुधाला सध्या सतरा-अठरा प्रति लिटर भाव मिळत असताना व्यावसायिक मात्र चाळीस रुपयापुढे दुधाची विक्री करत आहेत. त्यामुळे मूळ दूध उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. या परस्थितीत सरकारने अनुदान द्यावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे दूध अनुदानासाठी सुरू झालेल्या आंदोलनास शेतकऱ्यांनकडून मोठा पाठिंबा मिळणार आहे. या परस्थितीत आता सरकार याबाबत कधी निर्णय घेणार याची प्रतीक्षा आहे.