अहमदनगर - 'आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीही केंद्र सरकारने डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे', अशी प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
'1200 रूपये भावानेच मिळणार डीएपी खताची गोणी'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली आहे. आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी मागील वर्षीच्याच किंमती इतकीच म्हणजे १२०० रुपये भावाने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. असे विखे पाटील म्हणाले.
'हा निर्णय देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण'
'आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या फॉस्फरिक अॅसीड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली. परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना या खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता. यासाठीच केंद्र सरकारने याबाबत घेतलेला निर्णय देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे', असेही विखे यांनी नमूद केले.
'कोरोनाच्या या महासाथीच्या भयानक संकटात देशात अन्नधान्याची कमतरता भासली नाही. यामागे शेतकऱ्यांचे कष्ट आहे. याची जाणीव ठेवून आंतरराष्ट्रीय बाजारात रसायनांच्या किंमतीत वाढ झाली. तरीही मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला १४,७७५ कोटींचा बोजा सोसावा लागणार आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे', असे विखे पाटलांनी म्हटले आहे.
हेही वाचा - धक्कादायक : अवघ्या १३ तासात आई, वडील आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू