अहमदनगर - महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्याने पाथर्डीतील पंकजा समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य मुकुंद गर्जे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच टरबूजाला जोडे मारत राज्य नेतृत्वावरही जोरदार टीका केली.
दरम्यान, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी नाकारलेल्याच्या निषेधार्थ पाथर्डी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.
भाजपने नागपुरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दटके, बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले गोपीचंद पडळकर, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर केली आहे.
पंकजा मुंडे या मराठवाड्यासह राज्यात वंजारी आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभेत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजपच्या 100 च्या वर जागा विधानसभेत निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. तरही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली नसल्यामुळे पंकजा समर्थक आक्रमक झाले आहेत.