अहमदनगर - जामखेड तालुक्यातील कोरोना संदर्भातील गंभीर परिस्थितीस राज्य सरकारच जबाबदार आहे. समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वारंवार ऑक्सिजन खंडित होणे, रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळणे यातून प्रशासनाचा समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. बारामतीला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतात पण जामखेडला का मिळत नाहीत, असा प्रश्न माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित करत आमदार रोहित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. जामखेडमधील खासगी कोविड रुग्णालयांना भेटी दिल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकप्रतिनिधी आणि सरकारवर टीका केली.
आज मंगळवारी शिंदे यांनी जामखेड तालुका व सर्वच परिसरातील कोविड रुग्णालयास भेट दिली व तेयील सोयी सुविधा संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत पत्रकारांना माहिती देताना, आजच्या भेटीत बऱ्याच गंभीर गोष्टींचा खुलासा समोर आला असून ही अतीशय गंभीर बाब आहे. कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बेड भरपूर शिल्लक आहेत. परंतु ऑक्सिजन पुरवठा होत नाही. तसेच कोरोना रुग्णासाठी वाचण्याचा शेवटचा उपाय म्हणून वापरले जाणारे रेमडेसिवीर इजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. ते इजेक्शन फक्त बारामतीमध्ये मिळते असे ते म्हणाले. रेमडेसिवीर बारामतीत मिळते मग जामखेडमध्ये का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंजेक्शन मिळत नसल्याने कित्येक जणांना जीव गमवावा लागत आहे. याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नसुन लोकप्रतीनिधी व राज्य सरकार हेच जबाबदार आहेत त्यांनी त्यांची नैतीक जबाबदारी समजुन हे सर्व सुरळीत करणे गरजेचे असताना देखील राज्य सरकार व त्यांचे राज्यकर्ते दुर्लक्ष करत लोकांच्या जीवाशी खेळताहेत हे बरोबर नाही. तसेच ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करणे ही तर सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी असताना लोकप्रती निधी काय करतात लोकांची गंभीर परिस्थीती झाली आहे.
खर्डा,नान्नज या ठिकाणी तपासणी केंद्र व्हावीत -
अरणगाव, खर्डा, नान्नज या ठिकाणी असणाऱ्या प्राथमीक आरोग्य केद्रांत कोव्हीड तपासणी व उपचार सुरु करणे गरजेचे आहे. त्याकडेही जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असून जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप राम शिंदे यांनी यावेळी केला. लवकरात लवकर या प्राथमिक केद्रात कोविड रुग्णाच्या तपासणी व उपचार चालू केल्यास जामखेडला होणारा ताण कमी होऊन कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल. तसेच शासनाचे अधिकारी या संदर्भात माहिती देत नाहीत, त्यांनी दिलेली माहिती ही चुकीची व संशयास्पद आहे असे वाटते. कारण येथील वैद्यकीय अधिकारी अथवा प्रशासनातील सर्वच जबाबदारी अधिकारी कुठल्या तरी दबावात काम करत असल्याचे दिसून येते आहे. तेव्हा अशा बिकट परिस्थितीत जनतेच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. सर्व सोयीसुविधा पुरवणे गरजेचे असताना केवळ सर्व सावळा गोंधळ करून राज्य सरकार व सरकारचे प्रती निधी गाफील असल्याने राज्यासह जामखेड तालुक्याची परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.