अहमदनगर - बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त संगमनेरमध्ये आमदार सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन जल्लोष साजरा केला. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर थोरातांची विधिमंडळ नेतेपदी केलेली निवड ही महत्वपूर्ण मानली जात आहे.
बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्याचे पत्र दिले आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नसीम खान यांची विधानसभेचे उपनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी बसवराज पाटील तर प्रतोदपदासाठी के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.