अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मास्टर माइंड बाळ बोठे हा घटनेनंतर तीन महिन्यांपासून फरार असल्याने पोलीस प्रशासनाला सापडू शकला नाही. याबाबत पोलिसांनी पारनेर न्यायालयात बाळ बोठेला फरार घोषित करावं अशी मागणी केली होती. त्यावर आज (गुरुवारी) पारनेर न्यायालयाचे कनिष्ठस्तर प्रथम वर्ग न्यायाधीश ऊमा बोऱ्हाडे यांनी त्याला फरार घोषित केले आहे. काल बुधवारी न्यायालयात याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती, आज गुरुवारी न्यायालयाने निर्णय घोषित केल्याने बोठेच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची मागणी पोलीस प्रशासन करण्याची आता दाट शक्यता आहे.
तीन महिन्यांपासून मास्टरमाइंड बाळ बोठे फरार-
रेखा जरी हत्याकांडात वरिष्ठ पत्रकार असलेला बाळ बोठे हा मुख्य आरोपी म्हणून पुढे आला असून मात्र तो फरार आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेले असून नुकतेच त्यांच्या विरोधात पारनेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र बोठे सापडला नसल्याने त्याचा जबाब घेतल्यानंतर आणि तपास केल्यानंतर पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात येइल. बोठेला फरार घोषित करावा या मागणीचा अर्ज तपासी अधिकारी आणि नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपाधीक्षक अजित पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पारनेर न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज गुरुवारी सुनावणी पूर्ण होऊन न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बोठेला फरार घोषित केले
फरार बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या-
बोठेला आता फरार घोषित केले असल्याने त्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पोलिसांनाही आता बोठेच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याची मालमत्ता जप्त करून त्याची कोंडी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोठेला फरार घोषित करण्यात आल्यानं तपासी अधिकारी अजित पाटील बोठेच्या मालमत्तेची त्याचबरोबर बँक खात्याची माहिती संकलित करून न्यायालयात सादर करता येईल व सदर मालमत्ता जप्त करण्याची तसेच बँक खाती सील करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करतील.
तीस नोव्हेंबरला झाला होता रेखा जरे यांची निर्घृण हत्या-
तीस नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे या कुटुंबा सोबत पुण्याहून नगरकडे आपल्या कार मधून परतत असताना वाटेत जातेगाव घाटात त्यांच्या कारला मोटारसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी अडवले आणि तुमच्या कारच्या आरशाचा कट मारल्याचा कांगावा करत सुरुवातीला हुज्जत घातली त्याच दरम्यान आरोपींनी रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला, यात रेखा जरे यांचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. भांडणाच्या दरम्यान जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने एका आरोपीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला होता. हाच फोटो पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेला आणि सुरुवातीला दोन हल्लेखोर, तर या कटात सहभागी असलेले इतर तीन आरोपी अशा पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या पाच आरोपींची चौकशी दरम्यान रेखा जरे हत्याकांडाचा मुख्यसूत्रधार मास्टरमाइंड वरिष्ठ पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे असल्याचे उघड झाले. मात्र पोलीस त्याच्या पर्यंत पोहचेपर्यंत तो फरार झाला होता. तेंव्हापासून तो अद्याप फरार असून आता न्यायालयाने बाळ बोठेला अधिकृतपणे फरार घोषित केले आहे.
हेही वाचा अनुराग कश्यप, तापसीचा लॅपटॉप, मोबाईल जप्त, पुण्यात सुरु आहे चौकशी
हेही वाचा - शिवसेना बंगाल निवडणूक लढवणार नाही, ममता बॅनर्जींना दिला पाठिंबा