संगमनेर (अहमदनगर) - तालुक्यातील घारगाव येथील पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस पडून असलेल्या 53 दुचाकींचा जाहीर लिलाव करण्यात आला आहे. या सर्व दुचाकी दोन लाख पंधरा हजार रूपये किंमतीला एका लिलावधारकाने घेतल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने केंद्रबिंदू म्हणून घारगाव पोलीस ठाण्याकडे पाहिले जाते. आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आढळून आलेल्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावल्या होत्या. अशा एकूण 53 दुचाकी धूळखात अवस्थेत पडून होत्या. या दुचाकींचे मालक एकदाही दुचाकी नेण्यासाठी आले नाही. सर्व दुचाकींचा जाहीर लिलाव करण्याचे घारगाव पोलिसांनी ठरवले होते. त्यानुसार कायदेशीर पूर्तता करून 30 मार्चला हा लिलाव होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
त्यामुळे मंगळवारी (दि. 30 मार्च) सकाळी बुलडाणा, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अहमदनगर, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव या भागातून मोठ्या प्रमाणात लिलावधारक घारगाव पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व कायदेशीर पूर्तता केल्यानंतर या दुचाकी अहमदनगर येथील गरीब नवाज या लिलावधारकाने दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीला खरेदी केल्या आहेत.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - विदेशातील पिवळ्या रंगाच्या कलिगंड लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न