अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत शहरातील प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात येत आहे. मात्र पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कर्जत बंद पाळण्यात आला. पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. ( Youth Assaulted For Keeping Nupur Sharma Status ) ( Assault on a youth in Karjat )
याप्रकरणी फिर्यादीत नुपूर शर्माचे स्टेटस ठेवल्याने हल्ला झाल्याचे म्हटले आहे. या दोन गटात या पूर्वीही भांडणे झाली होती. त्यासंबंधीचे गुन्हेही कर्जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच वादातून रात्रीचा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नूपर शर्मा यांचे समर्थन करण्याशी याचा काही संबंध असल्याचे अद्याप तरी नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस संपूर्ण चौकशी करीत आहेत. तर पवार यांच्यावर हल्ला करणारे चार आरोपींना पोलिसांनी अटक केले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पवार याचे शहरातील पठाण नावाच्या एका युवकासोबत भांडण झाले होते. मारहाणही झाली होती. त्याचा राग काढण्यासाठी रात्रीचा हल्ला झाला असल्याचेही दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात येत आहे. रात्री 8 च्या सुमारास शहरातील भांडेवाडी रोडवर ही घटना घडली. हैदरवाडा भागात राहणाऱ्या तरुणांनी लाकडी दांडक्याने पवार याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी जखमी युवकाचा जबाब नोदवला असून, नुपूर शर्मा यांच सोशल मीडियातून समर्थन का करतोस असं म्हणत प्रतीक उर्फ सनी पवारला काही जणांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह, कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलिसांना कडून केला जातोय. दरम्यान आज कर्जत बंदची हाक देण्यात आली असल्याने शहरातील काही दुकाने बंद असून, काही व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत.