शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भाग्यश्री बानायत-धिवरे यांची राज्यसरकरने नियुक्ती केली आहे. कान्हुराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी केलेल्या बदल्यांमध्ये संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बानायत यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
बगाटेंची कारकीर्द राहिली वादग्रस्त
कान्हूराज बगाटे यांची संस्थानमधील नियुक्ती सुरुवातीपासून वादग्रस्त राहिली. काही सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी बगाटे यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. संस्थानच्या मुख्य कार्यकरी अधिकारी पदी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे आदेश आहेत. मात्र बगाटे थेट आयएएस नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. तसेच स्थानिक पातळीवरही बगाटे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचे खटके उडाले होते.
भाग्यश्री बानायत महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर
संस्थानच्या नव्या सीईओ म्हणून नियुक्ती झालेल्या भाग्यश्री बानायत या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर येथील रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत. बानायत यांची निवड नागालँड केडरमध्ये झाली होती. २०१८ मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आल्या आहेत. रेशीम उद्योग संचालयानालयात त्यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी उत्कृष्ट ठरलेली असून त्यांना अनेक सन्मान-पुरस्कारही मिळाले आहेत.
संस्थानमध्ये सीईओंची भूमिका महत्त्वाची
गेल्या काही वर्षांपासून संस्थानचा कारभार तदर्थ समितीमार्फत केला जात आहे. यामध्ये सीईओंची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे गेल्या काही काळापासून स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि संस्थानच्या प्रशासनात विविध विषयांवर वाद-विवाद होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. बगाटे यांच्या बाबतही अनेकदा वाद झाले. त्यांच्यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यावर पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे. त्यातच शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा विषयही न्यायालयात गेलेला आहे. ती प्रक्रियाही रखडली असताना आणि बगाटे वादग्रस्त ठरलेले असताना आता बगाटे यांना हटवून सीईओपदी महिला अधिकाऱ्याची करण्यात आलेली नियुक्ती, महत्वपूर्ण मानली जात आहे. महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीने ग्रामस्थ-प्रशासन यांच्यात सुसंवाद असेल या हेतूने या नियुक्ती कडे पाहिले जात आहे.