अहमदनगर- नगर दक्षिणेची लढत ही आमच्या दृष्टीने आघाडी विरुद्ध युती अशीच आहे. विखे विरुद्ध पवार, असे म्हणणे पवार यांच्यासाठी कमीपणाचे होईल, अशी आमची भावना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सांगितले. अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा राष्ट्रवादी भवनात पार पडला. यावेळी बोलताना काकडे यांनी ही भावना व्यक्त केली. असे बोलून त्यांनी पवार हे मोठे नेते असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
बैठकीला दिलीप वळसे पाटील, मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड, घनश्याम शेलार, दादाभाऊ कळमकर, विठ्ठल लंघे, सुजित झावरे, पांडुरंग अभंग आदी नेत्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
सुजय विखेंनी ३ महिनेपुर्वीच केली होती भाजपमध्ये जाण्याची तयारी-
नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहील हे आम्ही वेळोवेळो स्पष्ट केले होते. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे सुजय विखे यांनी अगोदरच भाजपमध्ये जाण्याचे ठरवले होते. याचा मला प्रत्यय महानगरपालिका निवडणुकीत आला होता. स्वतः सुजय यांनीच मला बोलून दाखवले होते, असा गौप्यस्फोट अंकुश काकडे यांनी यावेळी केला.
नगर दक्षिणेत विखे हेच निवडून येत असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यावर शरद पवार यांनी दिवंगत बाळासाहेब विखे या ठिकाणी पराभूत झाल्याचे सांगितले. मात्र, यामागे विखे कुटुंबाला दुखावण्याचा कोणताही पवारांचा हेतू नसल्याचे काकडे यांनी आवर्जून सांगितले.