अहमदनगर - दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील शाहिदांना श्रीरामपुरात मेणबत्ती लावत आम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. या श्रद्धांजली कार्यक्रमात आदमी पार्टी, काँग्रेस आणि इतर पक्षांनी सहभाग नोंदवला.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात, सिंधू बॉर्डर सह राजधानी दिल्लीच्या सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांची आंदोलन सुरु आहेत. या शेतकरी आंदोलना दरम्यान काही शेतकरी शाहिद होऊन देखील, केंद्र सरकार या आंदोलनावर तोडगा काढण्याकरता पुढे येत नाही आहे. हे शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या आंदोलनात शाहिद झालेल्या शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात असलेल्या महात्मा गांधी चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी श्रीरामपुर तालुक्याचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे सेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ क्षीरसागर, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, काँग्रेस कमिटीचे सचिन गुजर, संविधा बचाव समितीचे अहमदभाई जाहागिरदार, लहुजी सेनेचे हनिफ पठाण, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, आम आदमीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जोएफ जमादार, गोटु शिंदे सनी बोर्डे, राजेंद्र भोसले, काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर मुरकुटे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.