अहमदनगर - सरकारचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभारामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अशा वेळी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते. मात्र, असे होताना दिसत नाही. आम्ही टीका केल्यावर मुख्यमंत्री पूरपरिस्थितीची पाहणी करत असल्याचेही पवार म्हणाले. राज्यातील संस्थांनी आता पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी, असे अवाहनही पवार यांनी यावेळी केले.
वंचित बहुजन आघाडीला आणि आम्हालाही लोकसभेला एकमेकांचा फटका बसला आहे. आता दोघांनीही सामंजस्य विचार करणे गरजेचे असल्याचे अजित पवार म्हणाले. फार ताणून न धरता काही मध्यममार्ग काढता येईल, असा प्रयत्न केला पाहिजे. आमच्याबरोबर नाही आले म्हणजे बी टीम हे म्हणणे योग्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार असल्याचेही पवार म्हणाले.
विखे पाटलांना पवारांचा टोला
विरोधी पक्षात असताना केलेल्या आरोपांचे काय करायचे, असे म्हणत अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. सत्ताधारी लोक सांगत आहेत, आमच्या २२० जागा येणार , कोण म्हणत आहे २५० जागा येणार नशीब अजून २८८ जागा येणार असे म्हटले नाही. आम्ही खूप चढ उतार पाहिले असल्याचेही पवार म्हणाले.