राहुरी (अहमदनगर) - महात्मा फुले कृषी विद्यापीठात सातवा वेतन आयोग व 10/20/30 वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात अधिकारी/कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे. आंदोलनाचा काल (ता. 7) 11 वा दिवस असून सामूहिक रजेचे आंदोलन करण्यात आले.
प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत आपल्या मागण्यांचे निवेदन कुलसचिव मोहन वाघ आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांना देण्यात आले. यावेळी वाघ म्हणाले की, आत्तापर्यंत दिलेल्या निवेदनांचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल. सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रब्बी हंगाम सुरु होत आहे. तसेच, दिवाळीसारखा महत्त्वाचा सण जवळ आलेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा विचार करावा.
हेही वाचा - राज्य सरकारला मंदिरांकडून पैसे हवे, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
यावेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम म्हणाले की, 'आजपर्यंत केलेल्या आंदोलनात सर्वांनी जशी साथ दिली तशीच यापुढील बेमुदत काम बंद आंदोलनाला सर्वांनी साथ द्यावी. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील.'
रब्बी हंगाम सुरू
सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रब्बी हंगाम सुरू झाला आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या हरभरा, गहू, तूर, ज्वारी या पिकांच्या वाणांना शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळते. सध्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनात शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून विद्यापीठाने बियाणे विक्री सुरू ठेवली आहे. यावरून विद्यापीठाची शेतकऱ्यांप्रति असलेली जाणीव, बांधिलकी लक्षात येते.
बेमुदत काम बंद आंदोलन
महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ सकाळी 10.00 नंतर सर्व अधिकारी/कर्मचारी काळ्या फिती लावून सामाजिक अंतर राखत एकत्र जमले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत डॉ. उत्तम कदम, डॉ. सोपान मोरे, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. रवि आंधळे, डॉ. विजय पाटील, डॉ. स्वाती शिंदे, मच्छिंद्र बाचकर, एकनाथ बांगर, पी.टी. कुसळकर, कोळी यांनी मागण्यांसंदर्भात मनोगत व्यक्त केले.
7 नोव्हेंबर, 2020 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू होत असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासंदर्भात यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाचे आयोजन समन्वय संघाचे डॉ. उत्तम कदम, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्दन आव्हाड, श्रीमती सुरेखा निमसे यांनी केले.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी पुरता उदध्वस्त