अहमदनगर - बेकायदेशीर पिस्तूल वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवर खुप वाढत आहे. त्यातून घडणाऱ्या घटनांचे प्रमाणही वाढतच आहे. असाच एक प्रकार संगमनेर येथे घडला आहे. आरोपीने गावठी कट्ट्याद्वारे गोळीबार करून एकास जखमी केले व तो फरार झाला होता. त्या आरोपीला नगरच्या जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पांढरी पूल येथून अटक केली. गोळीबारात त्याने वापरलेला गावठी कट्टाही यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे.
मागील आठवड्यात बुधवारी घोडेगाव येथे सचिन गोरख कुऱ्हाडे या युवकावर आरोपी भारत सोपान कापसे याने दुचाकीवरून येत गावठी कट्ट्याद्वारे गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी युवकाच्या दंडात घुसली होती. गोळीबार करून आरोपी कापसे फरार झाला होता. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांनतर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. आरोपी कापसे हा पांढरी पुलावर येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन खंडागळे, पोलीस नाईक मल्लीकार्जुन बनकर, रवींद्र कर्डीले, रविकिरण सोनटक्के, दिबंगर कारखेले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन कोळेकर, राम माळी, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.