अहमदनगर : प्रथमच तोफखाना पोलिसांनी थेट गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून आरोपीला गावठी कट्टे बनवत असताना रंगेहात पकडले आहे. जमालसिंग अजितसिंग चावला असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मध्य प्रदेशमधील वडवणी तालुक्यातील खुरमाबाद या ठिकाणी गावठी कट्टे बनवून त्याची विक्री करत होता. तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये गेले होते. त्या ठिकाणी खुरमाबाद येथे एका झोपडीमध्ये हा कारखाना सुरू होता. गावठी कट्टे बनवत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून त्यांना अटक केली आहे.
नऊ काडतुसांसह ताब्यात घेतले : वीस जानेवारीला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून नगरच्या तारकपूर बसस्थानकावर आरोपी मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला वय वर्ष ३१, राहणार खुरमाबाद, तालुका सेंदवा याला तीन गावठी कट्टे आणि नऊ काडतुसांसह ताब्यात घेतले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी अटक आरोपीकडून अधिक माहिती मिळवत थेट मध्यप्रदेशात जाऊन ज्या ठिकाणी गावठी कट्टे बनवले जात होते त्या फॅक्टरीवर छापा टाकला. तसेच दुसऱ्या आरोपीस जेरबंद केले. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
मध्यप्रदेशच्या व्यक्तीला अटक : काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर बसस्थानकावर कट्टे विकण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून दोन कट्टे व नऊ काडतुसे जप्त करण्यात आली होती. पंधरा दिवस आधीच त्याने नगरच्याच एकाला कट्टा व काडतुसे विकली होती, असे तपासात समोर आले आहे. यापूर्वीही अनेकवेळा मध्यप्रदेशातील सेंधवा व उमरठी येथील कट्टे बनवून विकनाऱ्यांना नगर पोलिसांनी पकडले होते. मध्यप्रदेशात कारवाईसाठी नगरची पथके यापूर्वीही गेली होती. मात्र, प्रथमच अशा प्रकारची धाडसी कारवाई यशस्वी झाली आहे.
पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला : पोलिसांनी आरोपीला साहित्यासह रंगेहाथ पकडले. या कारवाईत एक अर्धवट बनवलेला गावठी कट्टा, एक इलेक्ट्रिक ग्राईंडर मशिन, तीन अर्धवट बनवलेले मॅक्झिन, एक लोखंडी मोठा चिमटा, एक हॅक्सा ब्लेड, एक कानस, ग्राईंडर मशिनचे तीन अर्धवट वापरलेले ब्लेड, एक स्प्रिंग, हँड ग्राईंडर असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.