अहमदनगर- जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले आहे. या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत जवानांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरात कँडल मोर्चा काढण्यात आला.
हा कँडल मार्च विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हवेत गोळ्या मारून स्वप्न दाखवणे सरकारने बंद करावे. सैन्याला गप्पा नको कृती करण्याची मोकळीक द्यावी. हे वाढलेले दहशतवादी हल्ले ही मोदी सरकारने अवलंबलेल्या काश्मीर विषयक धोरणाला मिळालेली तीव्र प्रतिक्रिया आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विनम्र अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.