अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ६ नोव्हेंबरला एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले होते. काल (रविवारी) रात्री शिरसाटवाडी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झाला.
आतापर्यंत पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्यात तीन लहान बालकांचा मृत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिला बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, तरीही बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक पुन्हा चिंतेत पडले. त्यामुळे वनविभागाच्या तज्ञ पथकाकडून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी खास मोहीम उघडण्यात आली आहे. काल रात्री एका मादी बिबट्याला पकडण्यात यश आले.
बिबट्याची होणार आरोग्य तपासणी -
पकडलेल्या बिबट्याला पाथर्डी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातून नगर येथे हलवण्यात आले आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तो नरभक्षक आहे की नाही हे ठरवले जाणार आहे. तालुक्यातील इतर ठिकाणीही आणखी बिबट्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत.
आतापर्यंत तीन बालकांचा घेतला आहे बळी -
काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील काकडदरा भागात एका साडेतीन वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी दोन बालकांचाही बिबट्याने बळी घेतला होता. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पाथर्डीतील नागरिकांनी केली होती.
हेही वाचा - पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांची शिकार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद