अहमदनगर Ahmednagar Crime : दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यावेळी तरुणाचा गळा आवळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी रात्री बेलापूर उक्कलगाव रोडवरील एकलहरे शिवारात घडली. नईम पठाण असं या दरोड्यात खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर दरोडेखोरांच्या मारहाणीत नईम पठाण यांची पत्नी बुशराबी पठाण या जखमी झाल्या आहेत. दरोड्याची घटना ( Ahmednagar Crime ) घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
पडद्याचा फास आवळून केली हत्या : नईम पठाण हे व्यावसायिक असून श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारात बेलापूर उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात नईम पठाण हे त्यांची पत्नी बुशराबी आणि दोन मुलांसह रहात होते. बुधवारी रात्री बारा ते दोनच्या दरम्यान चार दरोडेखोर पाठीमागील दरवाजातून घरात शिरले होते. त्यात एक महिलाही असल्याची माहिती बुशराबी यांनी दिली. यावेळी नईम पठाण यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दरोडेखोरांनी खिडकीला असलेल्या पडद्याचा फास त्यांच्या गळ्याभोवती आवळून त्यांची हत्या केली.
दरोडेखोरांची तरुणाच्या पत्नीला मारहाण : दरोडेखोरांनी पडद्याचा फास देऊन नईम पठाण यांची हत्या केल्यानंतर केल्यानंतर त्यांच्या पत्नी बुशराबी यांनाही बेदम मारहाण केली. दरोडेखोरांच्या मारहाणीत बुशराबी या देखील गंभीर जखमी झाल्या. यावेळी दरोडेखोरांनी घरातील पाच ते सहा लाख रुपयाची रोकड घेऊन पोबारा केला. बुशराबी पठाण या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. एकलहरे गावचे सरपंच रिजवाना अनिस जहागीरदार यांचे पती अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार हे तातडीनं घटनास्थळी आले. त्यावेळी नईम पठाण हे मृत झालेले आढळून आले. तर बुशराबी या गंभीर जखमी झालेल्या होत्या, त्यांना तातडीनं साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आलं.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल : अनिस जहागीरदार यांनी तातडीनं ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देऊन सगळ्यांना जागृत केलं. याबाबत बेलापूर पोलिसांना माहिती समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे उपनिरीक्षक सुरेखा देवरे आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचं पथकही गावात दाखल झालं. तसेच ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं.
श्वान पथक बंगल्याभोवतीच घुटमळले : बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता आहे. घटनेच्या कालावधीत एक स्विफ्ट कार या रस्त्यानं गेल्याचं आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीकारी, बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरोडेखोरांनी नईम पठाण यांचा गळा आवळून खून केल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. घटनास्थळी दाखल झालेले श्वान पथक बंगल्याभोवती घुटमळल्यानं उलटसुलट चर्चा सुरु आहेत. हा दरोडा आहे की अन्य काही, या दृष्टिकोनातून तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :