अहमदनगर : मकर संक्रांत म्हंटली की आपसूक पतंगोत्सव समोर येतो. आणि मग काय पतंग, दोरा, चकरी घेऊन सुर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत आपला पतंग आकाशात पक्षांप्रमाणे कसा भिरभिरत राहील याचीच आनंददायी स्पर्धा सुरु असते. याच स्पर्धेत जर तुम्हांला मोफत पतंग हवा असेल तर मग 'पाढे म्हणा, राष्ट्रगीत म्हणा, प्रतिज्ञा म्हणा, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नाची उत्तरे द्या नाहीतर, उठकबैठक काढा अन् मोफत पतंग घेऊन जात आनंद लुटा'. मात्र, यासाठी तुम्हांला कोपरगाव तालुक्यातील वारी येथील उत्सवप्रेमी नवनाथ कवडे यांनी बालगोपाळांसाठी गेल्या आठ वर्षापासून मकर संक्रांतीला सुरु केलेल्या अनोख्या उपक्रमला भेट द्यावी लागेल. विशेष म्हणजे कवडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या देशाप्रतीच्या कार्याला प्रेरित होऊन, या उपक्रमाला 'मोदी फ्री पतंग' असे नाव दिले आहे.
अशी आहे सगळी गम्मत-जम्मत : या उपक्रमात शालेय वयोगटांतील विद्यार्थ्यांना अगदी मोफत पतंगाचे वितरण केले जाते. मात्र, त्यासाठी काही गमतीशीर अटी ठेवण्यात आल्या आहेत बर का ? आता या अटी आहे तरी काय ? ज्या विद्यार्थ्याला मोफत पतंग हवा आहे. त्याने सर्वप्रथम पतंग मिळतात त्या ठिकाणी यायचे आहे. तेथे आल्यानंतर तेथे उपस्थित असलेले नवनाथ कवडे हे गंमत म्हणून त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतात. या मुलाखतीमध्ये सर्वप्रथम स्वतःचा परिचय असतो तो दिल्यानंतर, आपल्याला पतंग मिळणार असे विधार्थ्याना वाटते. परंतु, तसे होत नाही. मग सुरु होतो पुढचा टप्पा आणि त्यात पाढे, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम, शालेय पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणायला सांगितले जाते. यासह सामान्यज्ञान म्हणून देशाचे राष्ट्रपती कोण ?, पंतप्रधान कोण?, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण ? असे एक न अनेक प्रश्न विचारले जातात. ज्यांना उत्तरे येतात त्यांना मोफत पतंग दिली जातात. आणि ज्यांना येत नाही त्यांनाही दिली जातात. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना गमंत म्हणून उठक बैठक काढावी लागते. त्यावर काही मुले प्रश्नांपेक्षा आम्ही उठकबैठक मारतो अशा भूमिकेत असतात.
बोटाला लावली जाते शाई : आता पतंग दिल्यानंतर तो पुन्हा आल्यावर कसा ओळखायचा म्हणून विद्यार्थ्याने स्वःहस्तक्षरात त्याचे नाव लिहायचे आहे. एवढ्यावरच न थांबता निवडणूक प्रक्रियेत मतदान केल्यानंतर जशी बोटाला शाई लावतात अगदी तशीच शाई लावली जाते. त्यामुळे पुन्हा आला तरी लक्षात येतो. या गमतीदार उपक्रमाचे शकडो बालगोपाळ आनंदात लाभ घेतात. गेल्या दोन दिवसात दोन हजार पेक्षा जास्त पतंगांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे पतंग मिळण्याचे ठिकाण लक्षात येण्यासाठी बाहेर मोठा पतंग लावण्यात आला आहे.
४ हजार पेक्षा जास्त पतंगाचे मोफत वाटप : हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून गंमत म्हणून सुरु केला आहे. यात लहान मुलांचा सहवास लाभतो. पुढची पिढी म्हणून हि मुलं कोणाची आहेत? याचा देखील परिचय होतो. विशेष म्हणजे ज्यावेळी मुलांची मुलाखत घेतो. तेव्हा, मुलांच्या गमतीदार उत्तरातून हास्य दरवळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तरे आली नाही, तरी उठकबैठक काढून का होईंना पतंग घेऊनच जाणार या जिद्दीमुळे काहीसा आनंदही मिळतो. त्यामुळे उपक्रमात एका संक्रांतीला आठ दिवसात सुमारे ४ हजार पेक्षा जास्त पतंगाचे मोफत वाटप केली असल्याची माहिती नवनाथ कवडे यांनी दिली आहे.