अहमदनगर- कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून शासन-प्रशासन सक्तीने लॉकडाऊनचे पालन सुरू केले आहे. अनेकांना पोलिसांकडून प्रसाद दिला जात असला तरी दुसरीकडे पोलिसांनी आपल्यातल्या माणुसकीचे भान सोडलेले नाही. अहमदनगरमध्ये सामाजिक संस्थांच्या मदतीने शहर पोलीस विभाग समाजातील विविध दुर्बल घटकाला मदतीसाठी पुढे येत आहे. कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी प्रशासन योग्य उपाययोजना करीत आहेत.
दिव्यांग व्यक्तींचा अडचण ओळखून पोलीस प्रशासनाने घरी जाऊन त्यांना साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले केले. जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरात राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना अहमदनगर शहर व परिसरातील दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली होती.
शहर पोलिस दलाने याची दखल घेत पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी अपर अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज सोमवारी दिव्यांग बांधवांना उपजीविकेसाठी गहू,तांदूळ,तेल, दाल व इतर किराणा या जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केलेले आहे. शहर पोलिसांच्या या उपक्रमामुळे दिव्यांगांनी अहमदनगर शहर पोलिस दल तसेच या उपक्रमात सहभागी असलेले स्वयंसेवी संस्थेचे हरजीत वधवा, विपुल शाह, गुरकरान धुप्पर आदींचे आभार मानले आहेत. शहर पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.