अहमदनगर - कोपरगाव शहरात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत त्वरीत तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पायी प्रवास करुन सत्याग्रह केला. खांद्यावर कावड घेऊन कोपरगाव ते शिर्डी असा १८ किमीचा प्रवास त्यांनी केला.
येसगाव येथील ४ नंबरच्या तलावाचा गाळ काढण्याचे काम अजून झाले नाही. तसेच, ५ नंबरच्या तलावाचे काम सुरू झाले नाही. ही दोन्ही कामे त्वरीत करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली. यासाठी त्यांनी कावड यात्रा काढली. सकाळी ८ वाजता कोपरगाव येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांनी याची सुरुवात केली. तब्बल १८ किमी चालून ते शिर्डीतील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले.
कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे पालिकेला शहराला बारा दिवसाआड पुरवठा करावा लागतो. पालिकेने सर्व तळे भरुन घेतले होते. मात्र, त्या तळ्यांमध्ये गाळ असल्याने त्यांच्या क्षमतेइतके पाणी त्यात बसले नाही. यातील गाळ काढावा यासाठी संजय काळे यांनी वारंवार अर्ज केले होते.
अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम रखडले आहे. यासाठी संजय काळे आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी समृद्धी महामार्गाच्या गायत्री कन्स्ट्रक्शनकडे पाठपुरावा केला होता. तळ्यातील मातीचे नमुने त्यांच्याकडे पाठवण्यात आले होते. गायत्री कन्स्ट्रक्शनने काम करण्याचे आश्वासन दिले होते. पण, काही दिवसातच त्यांनी शब्द फिरवला.
५ नंबरच्या तलावाचे काम झाले तर, कोपरगावचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण, प्रशासनाची इच्छाशक्ती कमी पडते आहे. वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संजय काळे यांनी कावड सत्याग्रह केला.