अहमदनगर - केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला आहे, त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचा बिगुल दिला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे. पण सरकार सारखे चालढकल करत आहे, त्यामुळे येत्या दोन महिन्यात यावर सरकारने कार्यवाही न केल्यास या सरकारकडे पाहू, असे म्हणत अण्णांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचे आज शुक्रवारी राळेगणसिद्धी इथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सज्ज रहा, कार्यकर्त्यांना आवाहन -
राज्यात आंदोलनाची तयारी सुरू करा, यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येत आहे. शांततापूर्ण आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे, कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, असा निरोप अण्णांच्या कार्यालयाकडून राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.
भाजपाशासित राज्यांत लोकायुक्त करा -
दुसरीकडे अण्णा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या दोन दिवसांत पत्र पाठवून देशातील भाजपाशासित राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा, अशी मागणी करणार आहे. यावर अण्णां म्हणाले की, संसदेत मोदींनी माझ्या आंदोलनाचे कौतुक केले. चौदा दिवस मी उपोषण केले त्यानंतर लोकपाल कायदा संमत झाला, आता मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे आणि भाजपाशासित राज्यात लोकायुक्त कायदा संमत करून स्वायत्त लोकायुक्त नेमावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरकारे पडायला घाबरतात, संयम ठेवा -
देशातील आणि राज्यातील कुणाचेही सरकार असो, ते आंदोलनाला नव्हे, तर सरकार पडण्याला घाबरते. त्यामुळे शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले की जनसमुदाय मागे उभा राहतो. माहितीचा अधिकार, लोकपाल कायदा, असे अनेक आंदोलने केली आणि ती यशस्वी झाली. कारण जनमत आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले. सरकार पडेल, असे राज्यकर्त्यांना वाटले आणि लोकहिताचे कायदे करणे भाग पडले. त्यामुळे शांतता, संयम आणि अहिंसा या मार्गाने आंदोलन कार्यकर्त्यांनी करावे. सरकार आंदोलन मोडीत काढण्यासाठी तयार असते. मात्र, ती संधी सरकारला देऊ नका, असे आवाहन अण्णांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
हेही वाचा - मुंबईत साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार, एकास अटक