शिर्डी : कांद्याला प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये भाव मिळावा, तसेच अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, निर्यातीवर 500 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, नाफेड मार्फत कांदा 2500 रुपये क्विंटलने खरेदी करावा अशा अनेक मागण्या आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अहमदनगर -मनमाड राज्यमहामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा ओतुन देत सरकारचा निषेध व्यक्त केले आहे.
किमान 2500 रुपये बाजारभाव द्यावा : राज्यभरात कांद्याला मिळत असलेला अत्यल्प बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. उत्पादन खर्चही फिटेना अशी स्थिती असून याबाबत शासनाने लवकरत लवकर कांद्याबाबत धोरण स्पष्ट करत किमान 2500 रुपये बाजारभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहिर करावे. सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव हा कवडीमोल मिळत आहे.
सरकारला सस्पेंड करणार : दुसरीकडे शेतकऱ्यांची विज कनेक्शन कट करण्याचे धोरण राबवून शासन शेतकऱ्यांना अधिकच संकटात टाकत आहे. अधिकाऱ्यांनी विज कनेक्शन कट केले नाही तर त्यांना सस्पेंड करण्याचे आदेश सरकार देत आहे. हे चूकीचे असून जर सरकारने आपले धोरण बदलले नाही तर, येत्या 2024 ला सरकारला सस्पेंड केल्या शिवाय शेतकरी राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारला दिला.
कांदा रस्त्यावर ओतून सरकाचा निषेध : आजचे आंदोलन हे प्रातिनिधीक स्वरुपाचे असून सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. या पेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करु अशी भुमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली आहे. याप्रसंगी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रँक्कर ट्रॉलीतून आणलेला कांदा रस्त्यावर ओतून देत कांदाची माळ आपल्या गळ्यात घालत सरकारचा निषेध नोंदवला. अतिवृष्टीने व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण होऊन चार महिने होऊन देखील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य व केंद्र सरकारला माहिती देऊन नगर जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसानीचा एक रुपया देखील मिळाला नाही. तत्काळ बँक खात्यात रक्कम जमा करावी आदी मागण्यांसाठी राहुरीचे नायब तहसिलदार संध्या दळवी यांना मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांनाकडून देण्यात आले आहे.
रस्त्याच्या दूतर्फा वाहनांच्या रांगा : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे, सुरेश बाफना, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, पिंटूनाना साळवे, संतोष आघाव, पांडू उदावंत, सचिन म्हसे, आनंद वने, सतिष पवार, राहुल करपे, अशोक निमसे, सतिष निमसे, अशोक चौधरी सचिन उंडे आदी उपस्थित होते. राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मेघश्याम डांगे यांचे मार्गदर्शनात राहुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर. शेतकऱ्यांच्या रास्तारोको आंदोलना मुळे रस्त्याच्या दूतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.