अहमदनगर - 'लोकसभेत मिळालेल्या यशानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आलो आहे. त्यामुळे जन-आशीर्वाद यात्रेचा पहिल्या टप्प्याचे साईंचे दर्शन घेऊन समारोप केला,' असे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ते आज शिर्डीत साई समाधींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'जळगावमधील पाचोरा येथून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. जळगाव ते शिर्डी या जन-आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात जनतेचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर हे प्रेम असेच टिकून राहावे, यासाठी साईचरणी प्रार्थना केली. तसेच जनतेची सेवा करण्यासाठी साईबाबांकडे आशीर्वाद मागितले' असे आदित्य म्हणाले.
जन-आशीर्वाद यात्रा ही राजकीय यात्रा नाही. जनतेचे आभार मानण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले. तसेच तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना केली का? असा प्रश्न विचारला असता, 'मुख्यमंत्रीपदासाठी कुठलीही प्रार्थना केलेली नाही. मात्र, इतरांनी केली असेल तर माहिती नाही,' असे ते म्हणाले.