शिर्डी - संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा दोन वर्षीय बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि. २१ फेब्रुवारी) रोजी पहाटे घडली आहे. त्यामुळे आता महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखी किती बिबट्यांचे बळी जाणार आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे उड्डाणपूल असून रविवारी पहाटे बिबट्या महामार्ग ओलांडण्याच्या नादात असताना त्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला आहे. आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला अपघाताची माहिती दिली. सदरची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक सी. डी. कासार, अरुण यादव हे घटनास्थळी धाव घेत पोहोचले. बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.
यापूर्वीही ठार झाला होता बिबट्या
यापूर्वीही डोळासणे शिवारात अशाच पद्धतीने महामार्ग ओलंडण्याच्या नादात बिबट्या ठार झाला होता. चंदनापुरी घाट, डोळासणे, एकलघाट आदी ठिकाणी महामार्गावर बिबट्यांचे जीव गेले आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखी किती बिबट्यांना आपले जीव गमवावे लागणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.