अहमदनगर - लग्न समारंभात पाळत ठेवून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या एका सात जणांच्या टोळीला अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. टोळीकडून पोलिसांनी 23 लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ही टोळी मध्यप्रदेशातील आहे.
तेवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ही टोळी मध्यप्रदेशातील असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या टोळीकडून दोन कार, मोबाइल्स आणि रोख रक्कम असा 23 लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शिर्डी इथे झालेल्या एका विवाह समारंभात या टोळीने दीड लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास करत गुन्हे शाखेने गुप्त माहिती काढत तपास करून आरोपींना शोधून काढले. या टोळीने अशाच प्रकारे गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. मध्यप्रदेशातील देवास, गुलखेडी, कडीयासी या ठिकाणी तपास करून या सात आरोपींना अटक करण्यात आली.
टोळीचे स्थानिक कनेक्शन नाही
पोलिसांनी सांगितले, की या टोळीचे स्थानिक कुठलेही कनेक्शन पुढे आलेले नाही. लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत सोने-चांदी आणि रोख रकमेवर लक्ष ठेवून संधी मिळताच चोरी करून फरार होण्याची आरोपींची पद्धत होती, त्यासाठी स्थानिक गुन्हेगारांची त्यांनी मदत घेतल्याचे पुढे आलेले नाही. तसेच ही टोळी दोन ग्रुपमध्ये काम करत होती, एका टोळीने ऐवज चोरला की त्या ऐवजाची विल्हेवाट दुसरी टोळी करते. या पद्धतीने आरोपी काम करत होते. शिर्डीत चोरलेल्या दीड लाख रकमेपैकी 55 हजार या टोळीकडून पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अटक केलेले आरोपी
गोलू सुमेर झोजा ऊर्फ सिसोदिया (वय २५), संदीप सुमेर झोजा ऊर्फ सिसोदिया (वय १९), राधेश्याम उदयराम राजपूत (वय ३०), बिपीन राजपाल सिंग (वय २१), गिरीराज दिनेशचंद शुक्ला (वय २५), अनिल कमल सिसोदिया (वय ३०), विशाल कुमार बनी सिंग (वय १९).