अहमदनगर - कोपरगाव येथे हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शहरातील आत्मा मालिक रुग्णालय संचलित, एव्हर हेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. येथे ही घटना घडली. या घटनेनंतर बालकाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाला घेराव घालून संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेबाबत काहीच माहिती दिली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी रूग्णाच्या नातेवाईकांना सर्व माहिती दिल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील बिपखेडा येथील नानासाहेब जाधव यांचा मुलगा रोशन जाधव (वय 3) याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. पुढील उपचारांसाठी त्याला कोपरगाव येथील एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. येथे दाखल करण्यात आले होते. हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता रोशनला शस्त्रक्रिया कक्षामध्ये नेण्यात आले. साधारण सात ते आठ तास शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रोशनचा काही वेळाने मृत्यू झाला. त्यानंतर ही बाब डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले अशी माहिती, रोशनचे नातेवाईक कचरू महाले यांनी दिली.
हेही वाचा - पराभवानंतर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून ठरवणार भूमिका
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रोशनच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप केला. नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आपल्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
हेही वाचा - नराधमांना आमच्या ताब्यात द्या; जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
फॉर्मवर सह्या करा अगदी मोफत शस्त्रक्रिया करू, असे सांगितल्याने सहमती दर्शवली, असे मृत रोशनचे वडील नानासाहेब जाधव यांनी सांगितले. रोशनच्या नातेवाईकांना आपण सर्व कल्पना दिली होती, असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आपल्या मुलाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासून, दोषींवर कारवाईची मागणी रोशनच्या कुटुंबियांनी केली.
रोशनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितले.