अहमदनगर - एकाच वेळी दहा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हाॅटस्पाॅट बनलेल्या नेवासे तालुक्यातील सोनईतील संपर्कात आलेल्या 105 पैकी 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने धाकधुकीत असलेल्या ग्रामस्थ सुखावले आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सोनई गाव आहे. गावात एकाचा मृत्यू आणि एकाच वेळी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर ८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मंत्री गडाख यांनी गावात फेरफटका मारून ग्रामस्थांशी चर्चा केली.
मागील आठवड्यात औरंगाबाद येथून आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आणि तीन महिन्यात कोरी पाटी म्हणून मिरविणाऱ्या सोनईत प्रशासनाने हाॅट स्पाॅट लावत गावातील सर्व रस्ते लाॅक केले. संपर्कात आलेल्या सर्वांना ताब्यात घेवून काॅरंटाइन करण्यात आले होते.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बसस्थानक परिसराला भेट देवून रस्त्यावरच तहसीलदार,आरोग्य अधिकारी व पोलिस यंत्रणेस आवश्यक सूचना दिल्या. चार दिवसापासून या संशयित अहवालाची गावाला व परीसराला प्रतीक्षा होती. अहवाल येण्यात जसा वेळ जाऊ लागला, तशी धाकधूक वाढत चालली होती.अफवानाही पेव फुटला होता. पाचव्या दिवशी संपर्कातील ८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिराज सूर्यवंशी यांनी जाहीर केल्यानंतर तणावात असलेले चेहरे आनंदाने खुलले.
मुळा संस्थेत अलग करण्यात आलेल्या ८२ व्यक्तींना अहवाल निगेटिव्ह आल्याने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या परवानगीने घरी सोडण्यात आले आहे. त्या सर्वांना होम काॅरंटाइन राहण्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालानंतर बसस्थानक, डाॅ. आंबेडकर चौक व गावातील पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे.