अहमदनगर - नेवासा तालुक्यातील एका साठ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या घरातील एका व्यक्तीने घरातून पळ काढला आहे. परंतु ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडले. तपासणीसाठी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रूक येथे दीड महिन्यानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. कल्याण येथून आलेल्या साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली. कल्याण येथून 20 मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. 22 मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी सकाळी आलेल्या अहवालातून सदर महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण, कोण व्यक्ती आल्या आहेत याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.