अहमदनगर - नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने साई दर्शनाच्या व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ऑनलाइन दर्शन पास घेवूनच भाविकांनी शिर्डीला यावे, असे आवाहन साई संस्थानने केले असले, तरी भाविकांनी मात्र ऑफलाइन दर्शन टोकनला अधिक पसंती दिली आहे. दोन दिवसात किमान 40 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा आकडा समोर येत असून अजून देखिल भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे.
हेही वाचा - अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर 2 जानेवारीपर्यंत बंद
नाताळच्या तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने भाविकांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 16 नोव्हेबरला साई मंदिर खुले केल गेले. यावेळी दिवसभरात 6 हजार भाविकांची दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नंतर हा आकडा 6 हजारवरून 9 हजार करण्यात आला होता. तर, आता नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात 12 हजार ते 15 हजार भाविकांना मंदिर प्रवेश देण्याची व्यवस्था साई संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, 25 डिसेंबर रोजी नातळच्या दिवशी जवळपास 20 हजार भाविकांनी साईदर्शन घेतले, तर 26 डिसेंबर रोजी 22 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश मिळाल्याचे दिसून आले. सुट्टीच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तब्बल 11 हजार भाविकांनी सर्व नियम पाळत साई मंदिरात हजेरी लावली.
मंदिराबाहेर गर्दी
मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या इतर सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असले तरी बाहेर मोठी गर्दी दिसून येते. प्रवेशव्दार क्रमांक 2 जवळील दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र आहे. श्रीराम पार्किंग येथील ऑफलाइन दर्शन पासेस काऊंटर ते प्रवेशव्दार क्रमांक 2 पर्यंत भाविकांची चार पदरी दर्शन रांग दिसून आली आहे. साईसंस्थान परिसरात सर्व नियम पाळले जात असले तरी रस्त्यावरील रांगेत कोविड नियमांचा बोजवारा उडला आहे. सोशल डिस्टन्सिंग नियम फक्त नावापुरताच असल्याचे या ठिकाणी दिसून येते.
हेही वाचा - चंद्रकांतदादा म्हणजे बुड नसलेले चंपारण्यातील पात्र - विजय वडेट्टीवार