अहमदनगर - जिल्ह्यातील शेवगाव येथे नित्यसेवा रुग्णालय चौकात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोनजण जागीच ठार झाले. तसेच याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहादेव अर्जुन सातपुते (वय ५०, रा. तळणी) आणि अमोल अरुण देठे (वय३०, रा. शेवगाव), असे मृतांचे नावे आहेत. नित्यसेवा रुग्णालय चौकात मंगळवारी (४ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेहांचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झाला नसल्याने शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.