शिर्डी - महाराष्ट्रामध्ये सद्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे यात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना पुराचा जास्त फटका बसला आहे. या भागातील लोकांना अधिक मदत मिळावी यासाठी संगमनेर तालुक्यातल्या वडगापना गावातील डी. के मोरे विद्यालयातील 1590 विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मानवी साखळी करत मदतीसाठी आवाहन केले आहे. या मानवी साखळीचे ड्रोनद्वारे घेतलेली खास दृश्य.....
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्राऊंडवर कार्यक्रमासाठी बसवतात. त्यामधूनही एक समाज उपयोगी संदेश देण्याचे काम सह्याद्री संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील डी. के. मोरे जनता विद्यालय करत असते. आजही 73 वा स्वातंत्र्य दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
सह्याद्री संस्थेचे माजी सेक्रेटरी प्रतापराव मोरे यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. एक सामाजिक संदेश म्हणून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत व्हावी, म्हणून विद्यालयातील 1590 विद्यार्थ्यांची बैठक रचना 'पूर ग्रस्तांना मदत करा' या वाक्यात करण्यात आली होती. ही संकल्पना कला शिक्षक सत्यानंद कसाब व क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर, पोपट दये यांची होती. त्यांना प्रा. काकड भिमराज, भारत सोनवणे, प्रकाश नेहे तसेच, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली. तसेच विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांमधील मुलांच्या शालेय साहित्यासाठी मोट्या प्रमाणात मदत दिली आहे.