अहमदनगर : चोरीच्या वेगवेगळ्या घटना आपण ऐकल्या आहेत. परंतु कोपरगावात चोरीची एक अजब घटना घडली आहे. वाहने, घरातील सामान, सोने चांदीचे दागिने, या चोरीच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो, बघत असतो. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे अजब चोरीची घटना समोर आली आहे. राहत्या घराच्या समोरील पटांगनातून चक्क १२ गाढवांची चोरी झाल्याची अजब घटना समोर आली आहे.
८५ हजार किमतीचे गाढव : याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी जवळील कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथिल रहिवाशी असलेले लक्ष्मण किसन कापसे हे पारंपरिक माती व्यवसाय करतात. माती वाहण्यासाठी ते गाढवांचा वापर करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी आपले १४ लहान मोठे गाढव आपल्या राहत्या घरासमोर बांधून ठेवले होते. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने १२ लहान मोठे असे एकूण ८५ हजार किमतीचे गाढव लंपास केले आहे.
चोराविरुद्ध गुन्हा दाखल : याबाबत लक्ष्मण किसन कापसे वय ३४ वर्ष राहणार धारणगाव, ता. कोपरगाव यांनी दि. ७ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तालुका पोलिसांनी अज्ञात गाढव चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक आंधळे करीत आहे.
नोव्हेंबरमधील घटना : सांगली शहरात गाढव चोरीचे प्रका 26 गाढवे चोरीला गेल्याचा प्रकार नोव्हेंबर महिन्यात समोर आला होता. या गाढवांची किंमत सुमारे 3 लाख 90 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत होती. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गाढव चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. अमोल माने आणि रोहित माने यांच्या मालकीची ही 26 गाढवे होती.
गाढव चोरीच्य घटना : ऑक्टोबरमध्ये सांगली शहरामध्ये गाढव चोरीचा प्रकार घडला होता. यावेळी दोघा जणांना गाढव चोरताना रंगेहात देखील पकडण्यात आला होते. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी दोघांना अटक देखील झाली होती. त्यानंतर आता पुन्हा गाढव चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सांगली शहरातून सुमारे 26 गाढवे चोरून नेल्याची बाब उघडकीस आली होती. 3 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही गाढवे चोरी करण्यात आल्याचे समोर आले होते.