टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमधील कास्य पदकाचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनने कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताचा 4-3 ने पराभव केला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने दर्जेदार खेळ केला. पण गत सुवर्ण पदक विजेत्या संघाला ते पराभूत करू शकले नाहीत.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने अटॅकिंग हॉकी खेळली. ग्रेट ब्रिटनला सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावर भारतीय गोलकिपर सविता पुनियाने शानदार बचाव केला. त्यानंतर ग्रेट ब्रिटनने भारतीय गोलपोस्टवर जोरदार हल्ले केले. पण भारतीय गोलकिपर सविता पुनिया आणि बचावफळीने त्यांचे हे हल्ले परतावून लावले. सामन्याच्या 10व्या मिनिटाला पुन्हा ग्रेट ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावर देखील सविता पुनियाने त्यांना गोल करू दिला नाही. पहिल्या क्वार्टरमधील अखेरच्या 9 मिनिटात ग्रेट ब्रिटन भारतीय संघावर वरचढ राहिला. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या एली रायर हिने 16व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सारा रॉबर्टसन हिने 24व्या मिनिटाला आणखी एक गोल करत ग्रेट ब्रिटनची आघाडी 2-0ने वाढवली. पण त्यानंतर भारतीय गुरजीतने 24व्या आणि 26व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-2 ने बरोबरी साधून दिली. यानंतर वंदना कटारिया हिने 29व्या मिनिटाला गोल करत भारताला 3-2 ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा बोलबाला राहिला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनच्या पियर्ने हिने 35व्या मिनिटाला गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघाने एकमेकांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले केले. परंतु कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आलं नाही. तिसऱ्या क्वार्टर अखेरीस सामना 3-3 अशा बरोबरीत होता.
चौथ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी जोरदार खेळ केला. 48व्या मिनिटाला बाल्सडॉन हिने गोल करत ब्रिटनला सामन्यात 4-3 ने आघाडी मिळवून दिला. त्यानंतर ब्रिटनने भारताची बचावफळी अनेकदा भेदली. पण गोलकिपर सविता पुनियाने त्यांचे गोल करण्याची मनसुबे धुळीस मिळवले. या दरम्यान, ग्रेट ब्रिटनला पेनर्टी कॉर्नर मिळाला. पण यावर त्यांना गोल करण्यात अपयश आलं. भारतीय संघ देखील गोल करण्यात अपयशी ठरला. अखेरीस भारताचा 4-3 ने पराभव झाला.
हेही वाचा - Tokyo Olympics : हॉकी संघाच्या विजयानंतर मेजर ध्यानचंद यांच्या मुलाने केला आनंद व्यक्त, म्हणाले...
हेही वाचा - VIDEO : रवि दहियाचे प्रशिक्षक म्हणतात .. टोकियोमध्ये चांदी, पॅरिसमध्ये जिंकणार 'गोल्ड'