टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाचा पराभव झाला. रशियाच्या झवुर युगुऐव याने रवी कुमार दहियाचा 7-4 ने पराभव केला. या पराभवासह रवी कुमार दहियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारताचे हे पाचवे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने रौप्य तर पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं आहे.
अंतिम सामन्यात रवी कुमार दहिया आणि झवुर युगुऐव या दोघांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ करण्यास प्राधान्य दिलं. पकड निर्माण करण्यात रवी अपयशी ठरला. यामुळे युगुऐवला एक गुण मिळाला. त्यानंतर रशियाच्या कुस्तीपटूने रवी दहियाला रिंग बाहेर ढकलत गुण घेतला. रवीने तिसऱ्या मिनिटाला रशियन खेळाडूला खाली पाडत २-२ अशी बरोबरी साधली. रशियन खेळाडूने त्यानंतर जबरदस्त पकड निर्माण करत 2 गुणांसह 4-2 अशी आघाडी घेतली. ती आघाडी त्याने पहिले सत्र संपेपर्यंत कायम राखली.
दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पावित्रा घेत गुण घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, रशियाच्या खेळाडूने रवीला रिंगबाहेर ढकलत आणखी एक गुण घेतला. रशियन कुस्तीपटू युगुऐव रवीला पकड करूच देत नव्हता. अखेरीस रशियन खेळाडूने आक्रमकता वाढवत आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली आणि सामना जिंकला.
भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहियाने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या कुस्तीपटू सनायव नूरिस्लामचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्याने सनायव नूरिस्लामविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन मिनिटांत बचावात्मक पावित्रा घेतला. तेव्हा कझाकिस्तानच्या खेळाडूने पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीने मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमार कडे २-१ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नूरीस्लामने अँकर लेग डाव टाकत ८ गुण घेतले आणि सामन्यात ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली.
तेव्हा रवी कुमार याने नूरीस्लामला रिंग बाहेर फेकत ३ गुणाची कमाई केली. यात नूरीस्लामला दुखापत झाली. तेव्हा रवीने जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. तेव्हा विक्टरी बाय फाल नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले. त्याआधी रवी कुमार दहियाने उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियाच्या खेळाडूचा १४-४ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत गाठली होती.
कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा रवी दहिया सहावा कुस्तीपटू
सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पदक जिंकलं. सुशीलने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. सुशील शिवाय योगेश्वर दत्तने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं होतं. तर 2015 रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कास्य पदक जिंकले होते. खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हा कारनामा केला होता. आता रवी कुमार दहियाने भारतासाठी सहावं पदक जिंकलं आहे.
हेही वाचा - भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन
हेही वाचा - Tokyo Olympics : ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशची स्वारी थेट गोलपोस्टवर, फोटो होतोय व्हायरल