मेलबर्न - जगातील दुसर्या क्रमांकाची महिला टेनिसपटू रोमानियाची सिमोना हालेपने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक दिली आहे. हालेपने तिसर्या फेरीत रशियाच्या वेरोनिका कुदेरमेटोव्हाला पराभूत केले. हा सामना हालेपने ६-१, ६-३ असा सहज खिशात टाकला.
हेही वाचा - भारत-इंग्लंड दुसरी कसोटी : भारताने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार....
एका तास १८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात हालेपने कुदेरमेटोव्हाला वरचढ होण्याची संधी दिली नाही. चौथ्या फेरीतील हालेपचा सामना पोलंडच्या इनगा स्वितेकशी होईल. तर, पुरूषांमध्ये नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम यांनीही चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने तिसर्या फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिटझचा ७-६, ६-४, ३-६, ४-६, ६-२ असा पराभव केला.
तर, थीमने तिसर्या फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ४-६, ४-६, ६-३, ६-४, ६-४ असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. चौथ्या फेरीमध्ये थीमचा सामना बुल्गारियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल.
दरम्यान, जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकाच्या शापोवालोव्हला अॅलेक्सी युगर इलियासमीने पराभवाचा धक्का दिला. शापोवालोव्हला ५-७, ५-७, ३-६ अशी मात पत्करावी लागली.