लंडन - स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार आणि आठ वेळा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने २०१९ च्या विम्बल्डन स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद केली. फेडररने या स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये स्थान पटकावत आपल्या ३५० व्या विजयाला गवसणी घातली.
फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा ७-५, ६-२, ७-६ असा पराभव करत ग्रँडस्लॅममधील तब्बल 350 वा विजय मिळवला आहे. या विजयासह त्याने १७ वेळा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. हा भीमपराक्रम करणारा तो पहिलाच खेळा़डू ठरला आहे. फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सचा विक्रम मोडून काढला.
या विजयानंतर फेडरर म्हणाला, 'मी खूप खूष आहे. लुकासबरोबर छान सामना झाला. नक्कीच, मला आशा आहे की, एखाद्याने मला थांबविण्यासाठी विशेष प्रदर्शन करावे.' या स्पर्धेत भारताच्या मिश्र दुहेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. बोपन्ना-सबालेंका या जोडीला सिटाक - सिगेमंड या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर, शरण आणि यिंगयिंग दुआन यांना एडेन सिल्वा व इवान होयत या जोडीकडून पराभूत व्हावे लागले.