लंडन - स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार आणि आठ वेळा विम्बल्डन विजेता ठरलेल्या रॉजर फेडररला यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत एक मोठा विक्रम खुणावतो आहे. फेडररला बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे.
हा १०० वा विजय साकारण्यासाठी फेडररला उपांत्य फेरीसाठी जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. हा सामना जिंकल्यावर उपांत्य फेरीमध्ये त्याची गाठ स्पेनच्या राफेल नदालशी पडू शकते. असे झाल्यास २००८ नंतर प्रथमच हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. नदालने २००८ मध्ये फेडररचा अंतिम लढतीत पराभव केला होता.
फेडररने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत आधीही एक विक्रम रचला होता. त्याने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा ७-५, ६-२, ७-६ असा पराभव करत ग्रँडस्लॅममधील तब्बल 350 वा विजय मिळवला होता. या विजयासह त्याने १७ वेळा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत आपले स्थान पक्के केले होते. हा भीमपराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला असून अमेरिकेच्या जिमी कॉनर्सचा विक्रम फेडररने मोडून काढला होता.