पुणे - भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याला टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील दुहेरीसाठी वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी संकुलात ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. लिएंडरची ही अंतिम स्पर्धा असेल.
हेही वाचा - महाराष्ट्राची 'सुलक्षणा' BCCI मध्ये, बजावणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका
सर्वांना अपेक्षित असलेली वाईल्ड कार्ड देण्याची घोषणा आज पार पडलेल्या स्पर्धेच्या 'ड्रॉ' समारंभात करण्यात आली. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, खजिनदार संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणनेश्वरण व इटलीचा स्टार खेळाडू स्टेफानो ट्रॅव्हेगलिया उपस्थित होते.
४६ वर्षीय पेस यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्दनसोबत खेळणार असून पहिल्या फेरीत या जोडीसमोर भारताचा स्टार खेळाडू आणि गटविजेता दिविज शरण आणि न्यूझीलंडचा आरटेम सीटकच्या यांचे आव्हान असेल. मागील वर्षी दिविज शरण याने रोहन बोपन्नाच्या साथीत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
'टेनिसमधील दिग्गज पेसचे पुण्यात स्वागत आहे. पेसने देशासाठी खरी सेवा केली आहे आणि पुरस्कारही जिंकले आहेत. पेसने अनेक भारतीय तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्याचा शेवटचा सामना खेळताना पाहण्याचा अनुभव शानदार असेल', असे सुंदर अय्यर म्हणाले.