नूर सुल्तान - भारताचा प्रतिभावान कुस्तीपटू राहुल आवारे याला विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. राहुलला ६१ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या बेका लोमताझ याने पराभूत केले. या पराभवाबरोबर राहुलचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, तो रविवारी कांस्य पदकासाठी सामना खेळेल.
राहुल विरुध्द बेका या लढतीत बेकाने १०-६ अशी बाजी मारली. जार्जियाच्या कुस्तीपटूसमोर राहुल कमकुवत ठरला. पहिल्या राऊंडमध्ये बेकाने राहुलला पछाडत चार गुण घेतले. यानंतर राहुल दबावात खेळताना दिसून आला. बेकाने याच संधीचा फायदा उचलत ३ गुण घेतले. तेव्हा राहुलने कसा-बसा एक गुण मिळवला. पहिल्या राऊंडमध्ये बेका ७-१ ने पुढे होता.
दुसऱ्या राऊंडमध्ये राहुलने एक गुण घेत चांगली सुरुवात केली. त्यानंतर काही वेळात त्याने पुन्हा ४ गुणांचा डाव टाकला. यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. तेव्हा बेकाने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावत काउंटर अॅटक केला आणि २ गुण घेतले आणि शेवटी राहुलचा पराभव केला.
दरम्यान, राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या राहुलने फ्री स्टाईल प्रकारातील ६१ किलो वजन गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान कझाकिस्तानच्या कुस्तीपटू कलियेव्ह याचा १०-७ अशा फरकाने पराभव केला होता.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : दीपक पुनिया अंतिम फेरीत, भारताचे पदक पक्के
हेही वाचा - बजरंगाची कमाल...! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय