मुंबई : महिला प्रीमिअर लीगची पहिली आवृत्ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. चार सामन्यांनंतर WPL 2023 चा विजेता संघ निश्चित होईल. महिला प्रीमिअर लीगमध्ये पाच संघ सहभागी झाले होते. त्यापैकी 3 संघ प्लेऑफमध्ये पोहोचले. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अद्यापि गट-टप्प्यातील दोन सामने शिल्लक असून, ते मंगळवारी खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे निकाल ठरवतील की, कोणता संघ थेट महिला प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचेल कारण गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
याप्रमाणे संघ फायनलमध्ये पोहचणार : जर आपण सध्याच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघांचेही 10 गुण आहेत. परंतु, दिल्ली कॅपिटल्सचा निव्वळ रनरेटमध्ये थोडी धार आहे. त्यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान व्यापतात. यूपी वॉरियर्स 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत आहे कारण आजच्या सामन्यांच्या निकालानंतर, जो संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असेल तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल. दुस-या आणि तिस-या क्रमांकाचा संघ एलिमिनेटर सामन्यात एकमेकांसमोर येईल, त्यानंतर विजेता संघ अंतिम सामना खेळेल.
नेट रन रेटची महत्त्वाची भूमिका : आज दोन सामने खेळले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, आरसीबीचा संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. उर्वरित तीन संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानासाठी लढत आहेत. आजच्या सामन्यांमध्ये, जर मुंबई इंडियन्सने RCB आणि दिल्ली कॅपिटल्सने UP वॉरियर्सचा पराभव केला, तर नेट रन रेट ठरवेल की, दिल्ली आणि मुंबई यांच्यामध्ये कोणता संघ प्रथम स्थान मिळवेल. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आपापले सामने गमावल्यास यूपी वॉरियर्सचेही १० गुण होतील. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यापैकी ज्यांचा रनरेट चांगला असेल, तो संघ प्रथम स्थान पटकावेल आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. आता आज कोणत्या संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.