कझाकिस्तान - आजपासून विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेला नूर सुल्तान येथे सुरुवात होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याकडून देशाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे हे दोघे स्पर्धक कोणत्या रणनीतीने मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा - रनमशीन स्मिथने मोडला महाबली इंझमामचा 'तो' रेकॉर्ड
६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या बजरंगला या स्पर्धेत पहिली सीड मिळू शकते. त्याने मागच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत रजतपदक पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेत त्याला पदकाचा रंग बदलण्याची संधी असणार आहे. शिवाय टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठीही तो प्रयत्नशील असणार आहे.
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली विनेश फोगट प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली विनेश ५३ किलो गटात खेळणार आहे. तिने मागील तीन स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. आत्तापर्यंत विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्याही महिला कुस्तीपटूने सुवर्णपदक जिंकलेले नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा विनेशकडे लागल्या आहेत.
भारताचा ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार तब्बल ८ वर्षानंतर, या स्पर्धेत उतरणार आहे. २०१० मध्ये झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सुशीलने सुवर्णपदक जिंकले आहे.
भारतीय संघ :
- फ्री स्टाइल (पुरुष) : रवि कुमार (५७ किलोग्रॅम), राहुल आवारे (६१), बजरंग पुनिया (६५), करण (७०), सुशील कुमार (७४), जितेन्द्र (७९), दीपक पुनिया (८६), परवीन (९२), मौसम खत्री (९७), सुमित (१२५).
- फ्री स्टाइल (महिला) : सीमा (५० किलोग्रॅम), विनेश (५३), ललिता (५५), सरिता (५७), पूजा ढांडा (५९), साक्षी मलिक (६२), नवजोत कौर (६५), दिव्या काकरान (६८), कोमल भगवान गोले (७२), किरण (७६).
- ग्रीको-रोमन : मंजीत (५५ किलोग्रॅम), मनीष (६०), सागर (६३), मनीष (६७), योगेश (७२), गुरप्रीत सिंह (७७), हरप्रीत सिंह (८२), सुनील कुमार (८७), रवि (९७), नवीन (१३०).