यूजीन : भारताच्या अन्नू राणीने सलग दुसऱ्यांदा भालाफेक महिला गटात अंतिम फेरी गाठली होती. अन्नू अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिल्याने पदक हुकले. अन्नूने पहिल्याच प्रयत्नात 56.18 मीटर भाला फेकला. पहिला प्रयत्न तिच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा मागे होता. अन्नू राणीने दुसऱ्या प्रयत्नात ६१.१२ मीटरची शानदार भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात तिने सहावे स्थान पटकावले. अन्नू राणीने तिसऱ्या प्रयत्नात 59.27 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिने चौथ्या प्रयत्नात 58.14 मीटर लांब भालाफेक केली. तिचा पाचवा प्रयत्न 59.98 मीटर पर्यंत होता. सहाव्या प्रयत्नात 58.70 मीटर अशी तिची कामगिरी राहिली. ऑस्ट्रेलियाच्या केल्सी-ली बार्बरने सुवर्ण, अमेरिकेच्या कारा विंगरने रौप्य आणि जपानच्या हारुका किटागुचीने कांस्यपदक जिंकले.
अन्नू राणीचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास - अन्नू राणीची पात्रता फेरीत मध्यम सुरुवात झाली होती. ती स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होती, परंतु तिच्या शेवटच्या प्रयत्नात तिने 59.60 मीटर अंतर पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अन्नूने दुसऱ्या गटातील पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवले आणि दोन्ही गटातील पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 29 वर्षीय अन्नूचा या मोसमातील सर्वोत्तम स्कोअर 63.82 मीटर आहे.