पुणे - भारतात खेळांमध्ये क्रिकेटला सर्वाधिक पसंती दिली जाते. देशात क्रिकेटला देव देखील मानल जात. असं असताना भारतीय खेळ देखील जगाच्या पातळीवर यावेत या उद्देशाने मागील काही वर्षात प्रो कबड्डी स्पर्धा सुरु करण्यात आली. त्यात आता प्रो कबड्डीच्या धर्तीवर तब्बल 25 राज्यांमधून खेळाडूंना एकत्र आणत डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो-खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे 14 ऑगस्ट पासून अल्टिमेट खो खो स्पर्धा सुरू होत ( Ultimate Kho Kho Competition ) आहे.
120 खेळाडू 6 संघ - स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून, सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 4 सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे. या स्पर्धेत 25 राज्यातून तब्बल 240 खेळाडू हे सहभागी होणार आहे. यातील 120 खेळाडूंचा या स्पर्धेत जे 6 संघ आहेत, त्यात निवड होणार आहे. देशात पहिल्यांदाच खो-खो अल्टिमेट देशपातळीवर ही स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. फ्रँचाइजींना एकूण 240 खेळाडूंमधून आपल्या संघासाठी कमाल 20 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. या स्पर्धेमुळे व्यावसायिकतेचा स्पर्श झालेल्या संपूर्ण नव्या रूपातील खो-खोचे दर्शन सर्वांना होणार आहे.
असे आहे संघ - 1) चेन्नई क्विक गन्स (केएलओ स्पोर्ट्स), 2) गुजरात जायन्ट्स (अदानी स्पोर्ट्सलाईन), 3) मुंबई खिलाडीज (बादशाह आणि पुनीत बालन), 4) ओडिशा जगरनॉट्स (ओडिशा राज्य शासन), 5) राजस्थान वॉरिअर्स (कॅप्री ग्लोबल) आणि 6) तेगुलू योद्धाज (जीएमआर स्पोर्ट्स. ) हे संघ खो-खो स्पर्धेत खेळणार आहेत.
'खो-खो च्या स्वरूपात सर्व प्रकारे क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे लक्ष' - डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो-खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या या स्पर्धेतून खो-खो च्या स्वरूपात सर्व प्रकारे क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील व्यासपीठावर इतके गुणवान खेळाडू एकत्र आणण्याची कामगिरी सोपी नव्हती. परंतु, आमच्या प्रायोजकांच्या मदतीने या गुणवान खेळाडूंना शोधून, त्यांना सर्व सुविधा देऊन एका स्पर्धेसाठी आणण्याचे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलले आहे, असं यावेळी अल्टिमेट खो-खो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी म्हणाले.
अशी असेल स्पर्धा - साखळी फेरीत दररोज दोन अशा 34 लढती होणार असून बाद फेरी प्ले ऑफ पद्धतीने रंगणार आहे. बाद फेरीत क्वालिफायर व एलिमिनेटर लढतींचा समावेश आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून, रात्री 10 पर्यंत चालणार आहे. सोनी समूह या स्पर्धेचा माध्यम प्रायोजक असून हिंदी (सोनी टेन 3), इंग्रजी (सोनी टेन 1), तमिळ व तेलुगू (सोनी टेन 4) आणि सोनी लिव्ह या वाहिन्यांवरून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
अश्या पद्धतीने लीग सुरू झाल्याने आनंद - या स्पर्धसाठी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही तयारी करत होतो. महाराष्ट्राच्या मातीतील हा खेळ देशभरात प्रमोट केलं जाणार आहे. या पद्धतीने मातीच्या या खेळाला आज चांगल्या पद्धतीने दर्जा मिळत आहे, याचा आनंद होत आहे. मातीच्या या खेळातून खेळाडू हे देशपातळीवर जातील आणि त्यांना देखील व्यवसायिक स्वरूप प्राप्त होईन, याचा आम्हा खेळाडूंना आनंद झाला असल्याचं मत यावेळी स्टार खेळाडू प्रतीक वायकरने म्हटलं आहे.