मुंबई - महाराष्ट्रचा सुपुत्र आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अविनाश साबळेने एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भरीव कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम मोडला. या मॅराथॉनमध्ये अविनाशने इतर सर्व भारतीयांपेक्षा पुढे जात दहावे स्थान मिळवले.
गेल्या वर्षी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टीपलॅचेस प्रकारात अविनाशने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये अविनाशने ६१ मिनिटांपेक्षा कमी कालावधी घेत जोरदार कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. श्रीनु बुगाथाने १:०४:१६ अशी वेळ नोंदवत दुसरे, तर दुर्गा बहादुर बुद्धाने १:०४:१९ अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान राखले.
हेही वाचा - लुईस हॅमिल्टनला कोरोनाची लागण
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एएफआय) अधिकृत रेकॉर्डनुसार, हा विक्रम महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे यांच्या नावावर होता. त्यांनी १:०३:४६ अशी वेळ नोंदवली होती. ''एअरटेल दिल्ली हाफ मॅराथॉन योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचे पाहून मला फार आनंद झाला. अव्वल आंतरराष्ट्रीय धावपटूंव्यतिरिक्त भारताच्या अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम रचला. सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन'', असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठा पराक्रम -
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने मागील वर्षी झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठा पराक्रम केला. अंतिम सामन्यात अविनाशला १३वे स्थान मिळाले असले तरी त्याने पुढील वर्षी होणाऱ्या टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावले आहे. बारावीनंतर अविनाश भारतीय सैन्यात दाखल होऊन ५ महार रेजिमेंटमध्ये रुजू झाला. २०१३-१४मध्ये त्याची सियाचिन ग्लेशियरवर पोस्टिंग झाली होती.