मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाला गवासणी घातली. अॅथलेटिक्समध्ये भारताने मिळवलेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे. यामुळे नीरजच्या कामगिरीची चर्चा सोशल मीडियापासून ते गल्ली बोळात सर्वत्र होऊ लागली. या दरम्यान, नीरजचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे.
नीरजचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावी झाला. एका शेतकरी कुटुंबात तो जन्मला. चंदीगडमधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. भालाफेकमध्ये त्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खेळातील सर्वोच्च पदक जिंकलं. नीरज पानिपत जिल्ह्यातील त्याच मराठ्यांपैकी एक आहे. जे पानीपतच्या युद्धानंतर तेथील आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले होते. तिथे राहताना अधिक अडचणी येऊ नयेत म्हणून तेथील एक राजा रोड याच्या नावाची मदत घेत ते ‘रोड मराठा’ असं स्वत:ला म्हणवून घेऊ लागले.
आपण रोड मराठा असल्याची बाब, नीरजने 2016 मध्ये एका मुलाखतीमध्ये सांगितलं होती. पानीपतच्या युद्धातील पराभवानंतर सैनिकांनी आजूबाजूच्या परिसरात आश्रय घेतला आणि ते तिथेच स्थायिक झाले. राहण्यास अडचण येऊ नये म्हणून त्यांनी त्या परिसरातील एक राजा रोडच्या नावानं स्वतःची ओळख करून देण्यास सुरुवात केली.
नीरजची सुवर्ण कामगिरी
भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवले. त्यानंतर एकाही भालाफेकटूला त्याचा विक्रम मोडता आला नाही आणि नीरज चोप्रा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरले.
हेही वाचा - BAN vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजाने शाकिब उल हसनला धुतलं; एकाच षटकात खेचले 5 षटकार
हेही वाचा - Tokyo Olympics चा आज समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करणार बजरंग पुनिया