टोकियो - भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव याने बजरंगला नमवले. या पराभवासह बजरंगचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याला कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
अजरबैजानच्या कुस्तीपटू हाजी याने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखलं. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा 2-2 गुण घेत सामन्यात 4-1 ने आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात त्याने अधिक ताकतीने खेळ केला. त्याने बजरंगला पुनरागमनाची संधीच दिलीच नाही. त्याने 2, 2, 1, 2, 1 असे गुण घेतले. तर बजरंगला 2, 2 गुण घेता आले. बजरंगचा या सामन्यात 12-5 असा एकतर्फा पराभव झाला.
दरम्यान, अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव जर अंतिम फेरीत पोहोचला तर बजरंग पुनिया रेपेचाज राउंडमध्ये कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते. बजरंग पुनिया भारताचा स्टार कुस्तीपटू आहे. त्याच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत.
बजरंगने उपांत्यपूर्व सामन्यात इराणच्या कुस्तीपटूचा केला पराभव
बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत आशियाई चॅम्पियनशीपचा कास्य पदक विजेता इराणचा मोर्टेजा घियासी याला चितपट करत 65 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली होती. त्याने इराणच्या कुस्तीपटूचा 2-1 ने पराभव केला होता.
बजरंग पुनियाने उपउपांत्यपूर्व सामना असा जिंकला
बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या एर्नाजर अकामातलिवे याच्यावर टेकनिकल गुणांच्या आधारावर पराभव केला होता. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या खेळाडूविरोधात 3-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात बजरंगने किर्गिस्तानच्या खेळाडूचा पाय पकडत त्याला खाली पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु किर्गिस्तानच्या खेळाडूचा दुसरा पाय त्याचा हातात आला नाही. यामुळे बजरंगला गुण मिळालं नाही. अखेरच्या काही सेंकदात किर्गिस्तानच्या खेळाडूने जोरदार वापसी करत दोन वेळा बजरंगला रिंग बाहेर ढकलले. यात त्याला दोन गुण मिळाले. यामुळे सामना 3-3 अशा बरोबरीत होता. पण बजरंगने एकाचवेळी दोन गुण घेतलेले असल्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले होते.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये मिळणार सुवर्ण पदक? अदिती अशोक पदकाजवळ पोहोचली
हेही वाचा - पदक हुकल्यानंतर आश्रू अनावर; ब्रिटनच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवत केला भारतीयांचा सन्मान