नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेलो इंडियाशी संबंधित 2749 खेळाडूंना 8.25 कोटी रुपये भत्ता म्हणून जाहीर केला आहे. हे भत्ते 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील आहेत. "22 मे रोजी खेळाडूंच्या बँक खात्यात हा निधी पाठवण्यात आला. एकूण 2893 खेळाडूंना ही रक्कम दिली जाईल. उर्वरित 144 खेळाडूंना मेच्या अखेरीस हा निधी दिला जाईल," असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे, की या भत्त्यात त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासखर्च, घरी खाण्याचा खर्च आणि खेळाडूंकडून होणारा इतर खर्च यांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूच्या खात्यात 30,000 रुपये जमा केले आहेत.
हे भत्ते 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 21 क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक 386 खेळाडूंना हा निधी मिळाला आहे. याशिवाय हरियाणाच्या 381, दिल्लीच्या 225, पंजाबच्या 202 आणि तामिळनाडूच्या 165 खेळाडूंना हा निधी मिळाला आहे. प्रत्येक खेळाडूला दरवर्षी एक लाख 20 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. हा भत्ता खेलो इंडिया शिष्यवृत्तीचा एक भाग आहे.