नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) 11 क्रीडाप्रकारांच्या 32 विदेशी प्रशिक्षकांचा कार्यकाल 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये अनेक प्रशिक्षकाचे करार संपणार होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी या प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण घ्यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे एका वर्षासाठी पुढे ढकलले गेले आहेत. या निर्णयावर क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ''ऑलिम्पिक खेळ एक वर्ष पुढे ढकलल्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून हेच प्रशिक्षक खेळाडूंकडे राहिले पाहिजेत. नवीन प्रशिक्षक खेळाडूंना समजून घेण्यासाठी वेळ घेतात आणि नवीन प्रशिक्षकांची प्रशिक्षण प्रक्रिया समजण्यासाठी खेळाडू देखील वेळ घेतात. पण आपल्याकडे जास्त वेळ नाही.''
रिजीजूंनी यापूर्वीच सांगितले होते, की एका ऑलिम्पिकपासून दुसर्या ऑलिम्पिकपर्यंत चार वर्षांसाठी भारतीय आणि विदेशी प्रशिक्षक नेमले जातील. 2024 आणि 2028 ऑलिम्पिक पाहता चार वर्षांच्या कराराची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षकाची कामगिरी व संबंधित राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी बोलल्यानंतर चार वर्षांच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येईल.