नवी दिल्ली - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता रुसलान अल्बेगोव्हसह सहा रशियन वेटलिफ्टर्सवर डोपिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. मॉस्कोच्या अँटी-डोपिंग प्रयोगशाळेतील तपासानुसार, गुरुवारी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. या प्रयोगशाळेवर डोपिंगचे प्रकरण लपवल्याचा आरोप होता.
मॉस्कोच्या प्रयोगशाळेत सापडलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या शिस्त समितीनुसार रशियाचे सहा खेळाडू दोषी आढळले आहेत. मात्र, वैयक्तिक बाबींची माहिती फेडरेशनने दिली नाही. २०१२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत १०५ किलोच्या वजनी गटात रुसलान अल्बेगोव्हने कांस्यपदक जिंकले होते.